कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची सन २०४० सालापर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे.
योजनेचे जवळजवळ ९८ टक्के पूर्ण झाले असून केवळ दोन टक्के काम शिल्लक राहिले आहे. योजनेचे काम आता टेस्टिंगच्या पातळीवर आहे.
केंद्र, राज्य तसेच महापालिका यांच्या सहकार्यातून सुमारे ४८५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना २०१४ साली मंजूर झाली. योजनेच्या कामात अनेक अडथळे आले, तरीही नऊ वर्षानंतर योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. ५३ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम, २५ किलोमीटरची विद्युत वाहिनीचे काम, ८० एमएलडीचे जलशुध्दीकरण केंद्र, ९४० अश्वशक्तीच्या चार उपसा पंप, स्काडा यंत्रणा, स्वीचयार्ड, दोन जॅकवेल ही महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.
विद्युतवाहिनीच्या तपासणीचे काम दोन दिवसात
- आता बिंद्री ते काळम्मावाडी दरम्यान टाकण्यात आलेल्या विद्युतवाहिनीच्या तपासणीचे काम येत्या दोन दिवसांत होणार आहे. महावितरणकडून तपासणीचा अभिप्राय मिळाला की विद्युत प्रवाह सुरू केला जाणार आहे.
- योजनेचे सर्व काम पूर्ण झाल्यावर जलवाहिनीची चाचणी घेण्यासाठी दोन महिने लागणार होते. परंतु काम सुरू असतानाच जलवाहिनीची क्षमता तपासणी पूर्ण करण्यात येत आहे.
- ५३ किलोमीटरपैकी ४९ किलोमीटरपर्यंतची चाचणी पूर्ण झाली आहे. आधीच काम हाती घेण्यात आल्यामुळे चाचणी वेळ वाचला आहे. आता काही किरकोळ कामे बाकी आहेत. तीही येत्या आठ दहा दिवसांत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.