कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
इचलकरंजी : महापालिकेचे वाहन भारतीय जनता पक्षाच्या रॅलीमध्ये वापरावयास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिले.
निवेदनात, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ६ ऑक्टोबरला महाविजय संकल्प २०२४ घर चलो अभियानाचे आयोजन केले होते.
या अभियानामध्ये रॅलीच्या सुरुवातीला महापालिकेचे वाहन (एमएच ०९ एस ४२५१) अग्रभागी होते. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये शासकीय व निमशासकीय संस्थेचे वाहन वापरणे व त्या वाहनाचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करणे, ही बाब कायदेशीर स्वरूपाची आहे का? एका राजकीय कार्यक्रमामध्ये महापालिकेचे वाहन वापरण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याने दिला? या वाहनाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे एखादे वाहन १५ वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक ठिकाणी वापरणे गंभीर गुन्हा आहे.
तसेच या वाहनावर महापालिकेचा अधिकृत किंवा कंत्राटी चालक चालवत नसून अग्निशामक विभागाकडील फायरमन पदावर काम करणारा कर्मचारी चालवत असल्याचे दिसून येत आहे. ही गाडी महापालिकेची आहे, हे समजून येऊ नये म्हणून वाहनावरील नंबर प्लेटवर कागद चिकटविला आहे. महापालिका एका राजकीय पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे काम करीत आहे का, असा प्रश्न निर्माण होत असून भारतीय जनता पक्षाच्या रॅलीमध्ये वाहन वापरण्यास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असे म्हटले आहे.