कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणारे कर्तृत्ववान नेते असे आपण समजत होतो. पण ते तर साखर सम्राटांच्या ताटाखालचं मांजर झाल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
अजित पवार सांगतील तेच साखर उद्योगाचे धोरण ठरणार असेल तर मंत्री समितीच्या बैठकीची गरज काय? असा सवालही त्यांनी केला.
मागील हंगामातील उसाला उर्वरित चारशे रुपये द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही.
उलट तीन टप्प्यात एफआरपी देण्याबाबत कायदा असताना आम्ही एकरकमी पैसे दिल्याचा मुद्दा काही कारखानदारांनी उपस्थित केला. तर मंगळवारी (दि. १७) मंत्री समितीची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी आक्रमक झाले आहेत.
शेट्टी म्हणाले, एकरकमी एफआरपीबाबतचा शासन निर्णय करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. यासाठी त्यांचे उंबरठे झिजवले, मात्र त्यांचेही साखर सम्राटांच्या पुढे काही चालेना.
राज्यात गेल्या हंगामात १० कोटी ५४ लाख टन उसाचे गाळप झाले. साखरेला मिळालेला जादा भाव व इथेनॉलचे उत्पन्न पाहता, राज्यातील कारखान्यांकडे ४१२५ कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे प्रतिटन चारशे रुपये देणे सहज शक्य आहे.
हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळा पटवून देऊनही काहीच होत नाही, मग मंत्री समितीच्या बैठकीत असे वेगळे काय होणार आहे? असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.
