कोल्हापूर : सर्व कायम कर्मचाऱ्यांना एक तारखेला पगारासह निवृत्तिवेतन मिळाले पाहिजे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करावे, दरम्यानच्या काळात त्यांना २६ दिवस काम देण्यात यावे, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी येत्या दि.
३० ऑक्टोबरपासून बेमुदत संप जाणार आहेत. त्याची घोषणा गुरुवारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनानंतर केली.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाबरोबर चर्चा सुरू आहे; परंतु त्यातून काहीच मार्ग निघत नसल्याने तसेच प्रशासनातील अधिकारी निर्णय घेण्याच्या दृष्टीने कोणतीच प्रक्रिया राबवीत नसल्याने गुरुवारी कर्मचारी संघातर्फे मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने आयोजित केली होती.
सायंकाळी पावणेसहा वाजता रोजंदारी कर्मचाऱ्यांसह कायम कर्मचारी महापालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर जमले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली.
एक तारखेला पगार मिळालाच पाहिजे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक तारखेला निवृत्तिवेतन मिळालेच पाहिजे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम मिळालेच पाहिजे, चतुर्थ तसेच तृतीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती झालीच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाही, तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी निदर्शनाचे रूपांतर छोट्या सभेत झाले.
यावेळी कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, काका चरापले, निशिकांत सरनाईक यांची भाषणे झाली. अजित तिवले यांनी आभार मानले. यावेळी अध्यक्ष संजय भोसले यांनी, येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत जर कर्मचारी संघाने केलेल्या मागण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर दि. ३० ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम
दरम्यान, प्रशासनाने गुरुवारी सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना २६ दिवस काम देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असताना २६ ऐवजी १८ दिवस काम देण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द करून उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी सुधारित आदेश काढून पूर्ववत २६ दिवस काम देण्याचे परिपत्रक विभागप्रमुखांना दिले.
जे रोजंदारी कर्मचारी कार्यालयीन स्वरूपाच्या कामासाठी नियुक्त केले आहेत, त्यांना २२ दिवस काम द्यावे. ते कर्मचाऱ्याची २२ दिवसांपेक्षा जास्त काम करतील अशा कर्मचाऱ्यांच्या वाढीव दिवसाचे कामकाज एकूण २६ दिवसांच्या मर्यादेत खातेप्रमुखांनी प्रमाणित करून देण्याचा आहे. तसेच वर्ग-३ साठी वयोमर्यादा ५८ वर्षे व वर्ग-४ साठी वयोमर्यादा ६० वर्षे असल्याने त्यापेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना काम देणे तत्काळ थांबवावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.