घटस्थापनेला सिंहासनारूढ अंबाबाई, अलोट गर्दीत नवरात्रोत्सवाला प्रारंभ

0
81

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. घटस्थापनेनिमित्त विश्वाची सार्वभौम सत्ताधीश असलेल्या आदिशक्ती अंबाबाईची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली.

सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना होऊन देवीच्या नवरात्राेत्सवाला प्रारंभ झाला.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईचा नवरात्रोत्सव देशविदेशात प्रसिद्ध आहेत. आदिशक्तीचा जागर करणाऱ्या या उत्सवाला रविवारी मोठ्या मंगलमयी व उत्साही वातावरणात सुरुवात झाली.

सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे व मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची सिंहासनारूढ सालंकृत पूजा बांधण्यात आली.

श्री अंबाबाई ही सर्वसाद्धा. नवरात्राेत्सवात प्रतिपदेला तिची सिंहासनारूढ पूजा बांधली जाते. सिंह हे शौर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य व सत्तेचे प्रतीक आहे. श्री अंबाबाई ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश असल्याने घटस्थापनेला या रूपातील पूजा बांधली जाते. ती राजराजेश्वरी या स्वरूपात भक्तांना फलप्रदान करण्यासाठी सिंहासनावर विराजमान झाली आहे.

अत्यंत वैभवशाली व प्रसन्न असे हे देवीचे रूप द्विभूज आहे. उजव्या हाताने ती आशीर्वाद व अभय देत आहे. तर डाव्या हातात कमळ आहे. कमळ हे सौंदर्य, ज्ञान आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.

पहिल्याच दिवशी अलोट गर्दी

रविवार असल्याने नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी अंबाबाई दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सकाळपासूनच सगळ्या दर्शनरांगा भरून गेल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन मंडप म्हणून यंदा प्रथमच शेतकरी संघाची इमारत वापरण्यात आली. पहिल्याच दिवशी या इमारतीचा चांगला फायदा झाला.

पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतागृह, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड, प्रथमोपचार केंद्र अशा वेगवेगळ्या सुविधांमुळे भाविकांना विनात्रास देवीचे दर्शन घडले.

पर्यटन माहिती केंद्र व मोबाइल ॲपचे उद्घाटन
भवानी मंडपाती पागा इमारतीत उभारण्यात आलेल्या पर्यटन माहिती केंद्र मोबाइल ॲपचे शाहू छत्रपती व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here