कुरुंदवाड : येथील शेतकरी सुनील भीमराव चव्हाण याच्या खूनप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या आठ तासांत मुख्य आरोपीसह एकूण दहा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
राहुल किरण भबिरे (रा. कुरुंदवाड ) हा मुख्य आरोपी असून विटा (जि. सांगली) येथील सहा, इचलकरंजी येथील एक आरोपी आहे. एक अल्पवयीन असून तिघेजण हद्दपारीतील आहेत.
याप्रकरणी मुख्य आरोपी राहुल भबिरे, पवन नागेश कित्तुरे (रा. परीट गल्ली , कुरुंदवाड), सागर अरविंद पवार, अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबल, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात, सोहन माणिक ठोकळे (सर्व रा. विटा, जि. सांगली), शहाजन अल्लाबक्ष पठाण (रा. इचलकरंजी) व एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी मृत चव्हाण व राहुल भबिरे यांचे भांडण झाले होते. यावेळी चव्हाण याने राहुलच्या मानेवर जबरी वार करून गंभीर जखमी केले होते.
हाच राग मनात धरून त्याचा काटा काढण्याचे राहुलने ठरविले होते. त्यासाठी मित्रांना घेऊन सुनीलच्या पाळतीवर राहून सोमवारी सायंकाळी कोयत्याने पाठीवर, पायावर, हातावर वर्मी घाव घातल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
खून झाल्याचे समजताच सहायक पोलिस निरीक्षक फडणीस व उपनिरीक्षक पवार यांनी शिवतीर्थावरील सीसीटीव्ही फुटेजवर आरोपींच्या संशयित हालचाली पाहून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक साळवी यांनी दिली.
आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपीतील सागर अरविंद पवार, रोहन किरण जावीर, रितेश विकास खरात हे सराईत गुन्हेगार असून सांगली जिल्ह्यातून हद्दपार आहेत.
आठ तासांत खुनाचा उलगडा
सुनील चव्हाण यांचा शेतात खून झाल्याने आरोपी शोधणे कठीण काम होते. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक फडणीस व उपनिरीक्षक पवार यांनी अवघ्या आठ तासांतच आरोपींना जेरबंद केल्याने उपअधीक्षक साळवी यांनी कुरुंदवाड पोलिसांचे कौतुक केले.
शहरात तणावाचे वातावरण
मृत सुनीलचा मुलगा अनिकेत भारतीय सैन्यात आहे. तो मंगळवारी रात्री आल्याने सांगली सिव्हिलमध्ये शवगृहात ठेवण्यात आलेला सुनील यांचा मृतदेह शहरात आणण्यात आला. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.