कोल्हापूर : ललित पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या फोटोतील दादा भुसे यांची चौकशी करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. मात्र, त्या फोटोत उद्धव ठाकरेही आहेत. आता मग त्यांचीही चौकशी करायची का, असा प्रश्न उपस्थित करत, राजकीय पक्षांचे सातबारे पाहून टीका करणे योग्य नाही.
आधी आपल्या दिव्याखाली असणारा अंधार तपासा, असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अंधारे यांना लगावला. बुधवारी शासकीय विश्रामगृहात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, तो ललित पाटील इतके दिवस रुग्णालयात का होता, हे तपासले पाहिजे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सर्व बाजूंनी या प्रकरणाची चौकशी होईल. महिला आरक्षणासाठी २३ वर्षे वाट पाहावी लागली.
पंधरा वर्षे यूपीएचे बहुमत असूनही महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरज ओळखून हे विधेयक मंजूर करून घेतले.
अनेक कठीण प्रसंगांमध्ये महाराष्ट्रात एकमत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यानुसार, मराठा आरक्षणाबाबतही होईल, असा आशावाद व्यक्त करताना सर्व राजकीय नेत्यांनी सांभाळून वक्तव्ये करावीत, असा सल्लाही त्यांनी गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावेळी दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, रवींद्र खेबूडकर उपस्थित होते.
पुणे दंगलीबाबत बोलण्यास नकार
पुण्यातील २०१० सालच्या दंगलीबाबत मीरा बोरवणकर यांनी आपल्यावर आरोप केले आहेत, याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, मुळात २०१७ साली राज्य शासनाने हा खटलाच रद्द केला आहे. त्यामुळे त्यावर काहीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.