कोपर खैरणेत इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यामध्ये क्रेन चालक जखमी झाला असून इतर कामगार थोडक्यात बचावले. तर घटनास्थळाचा दुतर्फा रहदारीचा मार्ग असल्याने हा क्रेन रस्त्यावर कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
कोपर खैरणे सेक्टर १० येथे सागर सोसायटीच्या पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. मैथिली ग्रुप मार्फत त्याठिकाणी उंच टॉवर उभारला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून तिथे पाया भरणीचे काम सुरु असून नुकतेच पहिल्या मजल्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
यामुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी माल पोहचवण्यासाठी सुमारे ५० फूट उंच क्रेनचा वापर केला जात आहे. गुरुवारी दुपारी क्रेन वापरला जात असताना तो बांधकामावरच ढासळला.
यामध्ये क्रेन चालकाकडील भाग बाजूच्या नाल्यावर कोसळला असता नाल्याची भिंत तुटून क्रेन चालक रमजान अली हसन हा खाली कोसळला. यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तर संपूर्ण क्रेन खाली कोसळत असतानाच त्याखालील कामगारांनी पळापळ केल्याने थोडक्यात जीवितहानी टळली.
बांधकाम सुरु असलेल्या भूखंडाच्या दोन बाजूला रहदारीचे मुख्य मार्ग असून बाजूच्याच भूखंडावर नवरात्री निमित्ताने देवीची स्थापना करण्यात आलेली आहे. यामुळे अंतर्गत भागाऐवजी बाहेरील बाजूला हा क्रेन कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
दरम्यान क्रेनमुळे परिसरातल्या केबल वायरी तुटून नुकसान झाले आहे. क्रेनद्वारे लोखंडाचा मोठा भाग उचलला जात असताना क्रेन वाकला असता क्रेनच्या खालचा जोड तुटल्याने हि दुर्घटना घडल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच कोपर खैरणे पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेला जबाबदार कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर अपघातानंतर विकासकाने तातडीने दुर्घटना घडलेला परिसर बंदिस्त करून प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला.