कोल्हापूर : सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या संशयितास शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १९) रात्री खानविलकर पेट्रोल पंप चौकात अटक केली. प्रमोद दिनकर माळी (वय ४५, रा.
सोनतळी, ता. करवीर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाखाचा गुटखा आणि दोन लाखाची कार असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणारी एक कार कसबा बावड्याकडून शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी बावडा रोडवर सापळा रचला होता. गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास खानविलकर पेट्रोल पंप चौकात पोलिसांना संशयित कार आढळली.
कारची झडती घेतली असता त्यामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी असा सुमारे लाखाचा मुद्देमाल मिळाला. कारचालक माळी याला अटक करून पोलिसांनी कारसह मुद्देमाल जप्त केला.
त्याने कोणाकडून गुटखा आणला आणि पुढे कोणाला विक्री करणार होता, याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.