कोल्हापूर : पाचगाव (ता.करवीर) येथील शांतीनगर परिसरात गाडगीळ कॉलनीत घरासमोरील तरुण पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन पोलिसाने कोयता नाचवत कॉलनीत दहशत माजवून मारहाण केली होती. यात त्याच्या पोलिस पत्नीचाही समावेश होता.
याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी पोलिस दाम्पत्याचे निलंबन केले. आशुतोष वसंत शिंदे आणि रेश्मा आशुतोष शिंदे अशी निलंबन झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत विनोदकुमार गुणवंतराव वावरे (वय ४०) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोमवारी (दि. १६) रात्री पावणेनऊच्या सुमारास मारहाण आणि दहशतीचा प्रकार घडला होता.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली त्याची पत्नी रेश्मा हे दोघे किरकोळ कारणावरून कॉलनीतील लोकांशी नेहमी वाद घालत होते.
पत्नीकडे पाहत असल्याच्या संशयावरुन त्याने सोमवारी रात्री विनोदकुमार वावरे यांच्याशी वाद घातला. कोयता नाचवत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले फिर्यादी, त्यांची बहीण आणि दाजी यांना शिंदे दाम्पत्याने मारहाण केली.
याबाबत करवीर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यदीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी शिंदे दाम्पत्यावर निलंबनाची कारवाई केली.