कोल्हापूर -भाविकांच्या अलोट गर्दीत श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा

0
72

डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई-तुळजाभवानची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी मध्यरात्री करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा आई अंबाबाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात पार पडला.

नवरात्रोत्सवात आठव्या माळेला रविवारी अष्टमीच्या रात्री हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अंबाबाईने अष्टमीच्या रात्री महिषासुराचा वध केला, म्हणून फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा निघते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्रीअंबाबाई देवीचे दर्शन घेऊन देवीच्या पालखीचे पूजन केले. उद्योजक राजू जाधव यांच्या परिवारानेही पालखीचे पूजन केले. यानंतर परंपरेनुसार रात्री ९.३० वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीचे वाहन नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव तथा प्रांत सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई, राजू लाटकर, आदिल फरास आदी मान्यवर उपस्थित होते.

आई अंबाबाईच्या स्वागतासाठी प्रदक्षिणा मार्गावर भक्तांनी आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. गुजरी कॉर्नर मंडळ व अन्य मंडळांसह महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व भाविकांकडून ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.

मार्गावर दुतर्फा विद्युत रोषणाई होती. महाद्वारातून गुजरी, भाऊसिंगजी रोड या पारंपरिक मार्गांवरून पालखी भवानी मंडपात आली. तेथे आई अंबाबाई आणि तुळजाभवानीची भेट झाली. येथे छत्रपती घराण्याकडून आरती करण्यात आली.

तेथून वाहन मिरजकर तिकटी मार्गे गुरुमहाराजांच्या वाड्यावर आले. बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वाहन रात्री बाराच्या सुमारास पुन्हा महाद्वारातून मंदिरात पोहोचले आणि नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. त्यानंतर देवीची जागराची पूजा बांधली. श्रीपुजकांच्या हस्ते महाकाली मंदीरासमोर अष्टमीचा होम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here