कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा येथील ग्रामदैवत श्री रवळनाथाच्या मंदिरामध्ये आज अष्टमीच्या दिवशी डोक्यावरील जागर आरतीचे आयोजन करण्यात येते. ही आरती भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता ही आरती होणार आहे.
या आरतीच्या आधी ज्यांच्याकडे आरतीचा मान आहे अशा गुरव यांच्या डोक्यावरील सर्व केस कापले जातात. त्यानंतर त्यावर ताम्हण ठेवून त्यामध्ये दिवा प्रज्वलित करण्यात येतो.
रवळनाथ दर्शन घेतल्यानंतर चांगभलच्या गजरात रवळनाथ मंदिराभोवती ही आरती घेवून गुरव मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. यावेळी त्यांच्या पाठीमागे शस्त्रास्त्रांसह मानकरी चालत असतात.
पूर्वी ही आरती डोक्यावरून पडल्यानंतर संबंधितांचा शिरच्छेद गेल्याची आख्यायिका सांगितली जाते. यावेळी अतिशय उत्कंठापूर्ण वातावरण निर्माण झालेले असते. रवळनाथ मंदिराच्या सभोवती मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.