Kolhapur: साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील; वाघापुरात कृष्णात डोणे यांची भाकणूक

0
72

साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा राज्य करील, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाज समाजात भांडणं लावतील, देशात मोठा कायदा येईल, शेतीचे भाव वाढत जातील, कुणब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाय, मेघराजाची वाट बघत राहशीला, दुष्काळ पडंल अशी भाकणूक कृष्णात डोणे यांनी वाघापूर (ता.

भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य केली



लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथील ज्योतिर्लिंग देवालयाच्या प्रांगणात जागरानिमित्य रात्री भाकणूककार कृष्णात डोणे- वाघापूरकर यांनी भाकणूक केली.

त्यांच्या भाकणुकीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक, शेतीविषयक, गोषवारा पुढीलप्रमाणे : वाघापूर हे गाव, त्याचं दूरवर नाव हाय, वेदगंगेच्या काठी बाभळीच्या बनात माझी वस्ती हाय ,वाघापूर गावचा महिमा वाढत जाईल, साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील, भगवा झेंडा बाळानों राज्य गा करील, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाज समाजात भांडणं लावतील, देशात गा मोठा कायदा येईल, शेतीचे भाव वाढत जातील, कुणब्याच्या बाळाला मोठा इचार पडलाय, मेघराजाची वाट बघत राहशीला, पडंल पडंल बाळांनो दुष्काळ पडंल.

नदीबाईला कुलपं पडतील, मानकऱ्यांची विटंबना करशील तर थोबाडीत खाशीला, मेघाची कावड गैरहंगामी हाय, मेघाच्या पोटी आजार हाय, पाऊसपाणी पीक यांचं कालमान बदलत चाललंय, कोरोना पेक्षा मोठी महामारी येईल, दीड महिन्याचे धान्य उदंड पिकंल, तांबडी रास मध्यम पिकंल, ज्याच्याकडे धान्य तो शहाणा होईल, वैरणीला सोन्याची किंमत येईल, धान्यांची व वैरणीची चोरी होईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, बैलाची किंमत बकऱ्याला येईल, ऊसाचा काऊस होईल, साखरेचा भाव तेजीत राहील, ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ उडेल,मायेचं लेकरु मायेला ओळखायचं नाही,

चालता बोलता मनुष्याला मरण येईल, माझं माझं म्हणू नका,माणसाला माणूस खाऊन टाकील, येतील येतील लाकडाची डोरली येतील,तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल,येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल,नदीकाठावरील जमीन ओसाड पडंल, गर्वानं वागू नका, गर्वाचं घर खालीच होईल, होईल होईल भूकंप होईल, जंगलातील प्राणी गावात येईल, गावातील माणूस जंगलात जाईल, ज्योतिर्लिंगाची करशीला सेवा तर खाशीला मेवा, बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन.

यावेळी भाकणुकीस ज्योतिर्लिंग देवालयाचे पुजारी दत्ता गुरव, जोतिर्लिंग देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष, सरपंच बापूसाहेब आरडे, समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सर्व नवरात्रकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here