हलसवडे (ता. करवीर) येथे जमिनीच्या वादातून केलेल्या सशस्त्र हल्ल्यात श्रीमंत पांडुरंग कांबळे (वय ५१, रा. हलसवडे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा ऋतुराज श्रीमंत कांबळे (वय १८) व विनोद देसाई हे गंभीर जखमी झाले.
याबाबत जखमी ऋतुराज कांबळे याने दशरथ रुद्राप्पा कांबळे, मोहन दशरथ कांबळे, रघुनाथ दशरथ कांबळे, वैभव नामदेव कांबळे, साहील रघुनाथ कांबळे (सर्व रा. हलसवडे) या पाच जणांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, श्रीमंत कांबळे व आरोपी दशरथ कांबळे यांच्यात हलसवडे येथील शेतजमीन गट क्र. ५२७ मधील वाटणीवरून वाद सुरू आहे. दशरथ कांबळे याने शनिवारी रात्री श्रीमंत कांबळे यांच्या दारात जमाव करून हल्ला केला.
मोहन याने ऋतुराज याच्या पोटावर चाकूने वार केला तर विनोद देसाई याच्यावर रघुनाथ कांबळे याने कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी श्रीमंत कांबळे यांच्या छातीवर वैभव कांबळे याने चाकूने गंभीर वार केला.
त्याचवेळेस रघुनाथ व साहील यांनी श्रीमंत कांबळेंच्या पाठीवर व खांद्यावर वार केले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अधिक तपास स. पो. नि. डी. एम. गायकवाड करत आहेत.