आंबा: येथील ग्रामदैवताच्या जागराचा सोहळा रंगला असताना तरूणाई लेझीम नृत्यावर मंदिर प्रदक्षिणा घालत होती. दरम्यानच, लेझीम खेळात तल्लीन होऊन नाचणारे राजाराम पांडूरंग पाटील (वय ४८) यांना दरदरून घाम फूटून ते खाली कोसळले.
हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल, रविवारी मध्यरात्री घडली. होतकरू राजारामचा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला.
राजाराम पाटील हे अंबेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. आंबा जंगल सफारीचा ते व्यवसाय करीत होते. गावच्या सार्वजनिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार होता. गेले आठ दिवस नवरात्रोत्सवातील कार्यक्रमात ते राबत होते.
जागरण, धावपळ आणि लेझीम खेळताना झालेल्या दमछाकीमुळे राजारामला हृदयविकाराचा झटका आला अन् मृत्यू झाला. आज पंचकृषीतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.