प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर: माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत गुरुपरंपरेकडून घेतलेला संगीताचा वारसा यापुढे कोल्हापूरच्या मातीतील संगीतप्रेमींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असून जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा मी या कामासाठी येईन असे प्रतिपादन कोल्हापूरच्या पहिल्या करवीर तारा पुरस्कार प्राप्त श्रुती सडोलीकर-काटकर यांनी केले.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी एवढे बोलून हा पुरस्कार माता-पिता व गुरुजनांना सन्मान देत त्यांना अर्पण केला. शाही दसरा कोल्हापूरचा यानिमित्ताने प्रशासनाने यावर्षीपासून कोल्हापूर नगरीत जन्मलेल्या व देश विदेश स्तरावरती नाव गाजवलेल्या महिलेला करवीर तारा पुरस्कार देण्याचे सुरू केले आहे.
आणि पहिलाच पुरस्कार शास्त्रीय संगीतात उच्च स्तरावरील प्राविण्य मिळवलेल्या महान अशा श्रुती सडोलीकर-काटकर यांना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
केशवराव भोसले नाटय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, ज्येष्ठ चित्रकार विजयमाला मेस्त्री, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील, गुरुदास फाउंडेशनचे संस्थापक राजप्रसाद धर्माधिकारी, कॅप्टन महाडकर, देवल क्लबचे संचालक श्रीकांत दिग्रजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रुती सोडलीकर यांनी आपल्या संगीत क्षेत्राची पायाभरणी कोल्हापुरातच झाल्याचे सांगितले. वडिलांनी जयपुर अंत्रोली घराण्यातील संगीत क्षेत्राचा वारसा पुढे नेत मला या शास्त्रीय संगीताचं शिक्षण दिले. संगीताचा अभ्यास शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्तरावरच करावा लागतो असेही त्या यावेळी म्हणाल्या.
कोल्हापुरात नाट्य दिग्दर्शनाचे धडे मिळाले तर मुंबईत वडिलांकडे येणाऱ्या आग्रा, पटियाला, ग्वाल्हेर तसेच मराठी क्षेत्रातील गायक, शास्त्रीय संगीत प्रेमी यांना वडील शास्त्रीय संगीताचे धडे देत असताना माझा या क्षेत्राचा पाया भक्कम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या सन्मानाची परतफेड कशी करावी यावर त्या बोलताना म्हणाल्या की मी भविष्यात तुम्ही जेव्हा मला हक्काने बोलवाल त्यावेळी मी या शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी येईन.
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी पहिल्या करवीर तारा पुरस्काराची निवड योग्यच असल्याचे यावेळी सांगितले. त्या काळी शाहू महाराजांनी या कलेला प्रोत्साहन देत जयपुर घराण्यातील शास्त्रीय संगीत तज्ञ कोल्हापुरात आणले आणि या कलेला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले असे ते म्हणाले.
महाराष्ट्र शासनाने शाही दसऱ्याला राज्यस्तरावरचा महोत्सव घोषित केल्याने आता या संगीत व नाटक क्षेत्रालाही असेच प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. ते म्हणाले संगीत क्षेत्र जात-पात पाहत नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारी कला म्हणजे संगीतक्षेत्रच आहे. करवीर तारा पुरस्कारामुळे आता येथील महिलांना अधिक प्रोत्साहन मिळेल.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर तारा पुरस्कार कशा पद्धतीने निवडला जातो याबद्दल सांगून पहिल्या पुरस्कार विजेत्या श्रुती सडोलीकर -काटकर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. करवीर तारा हा पुरस्कार कोल्हापूरच्या महाराणी ताराराणी यांच्या नावावरूनच घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व अधिक प्रमाणात वाढत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात राजप्रसाद धर्माधिकारी व व्ही बी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शाहू महाराजांच्या काळात संगीत क्षेत्राला कोल्हापूरमध्ये मोठी भरारी मिळाल्याचे सांगितले.
त्यावेळच्या संगीत क्षेत्रातील कलाकारांपासून ते टेंभे, केशवराव भोसले, बालगंधर्व यांनी कोल्हापूरचा वारसा पुढे नेत आता श्रुती सोडलीकर -काटकर मॅडम या क्षेत्रातील वारसा पुढे नेत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
करवीर तारा पुरस्काराबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली आणि यापुढे अशाच पद्धतीने दरवर्षी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून करवीर तारांची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर करवीर तारा २०२३ पुरस्कार प्राप्त श्रुती सडोलीकर-काटकर यांच्या विषयीची चित्रफीत दाखवण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव नरके यांनी केले तर आभार उदय गायकवाड यांनी मानले.