कोल्हापूर – महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक तीनमधील घरफाळा विभागात कार्यरत असलेले दोन मुकादम लिपिक साडेतीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले.
शेखर अरुण पाटील (वय २६, रा. माने गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि रोहित विनायक जाधव (वय ३२, रा. तस्ती गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी अटकेतील लाचखोर कर्मचा-यांची नावे आहेत.
तक्रारदाराने खरेदी केलेल्या मालमत्तेची घरफाळा पत्रकावर नोंद करण्यासाठी कर्मचा-यांनी लाच स्वीकारली. ही कारवाई गुरुवारी (दि. २) सायंकाळी राजारामपुरी येथील कार्यालयात झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने राजारामपुरी परिसरात नवीन घर खरेदी केले होते. या मालमत्तेची महापालिकेच्या घरफाळा विभागात नोंद करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता.
मालमत्ता नोंद करण्यासाठी मुकादम लिपिक शेखर पाटील याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी करून एसीबीच्या पथकाने गुरुवारी राजारामपुरी विभागीय कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना शेखर पाटील आणि मध्यस्थ मुकादम लिपिक रोहित जाधव या दोघांना पथकाने अटक केली.
अटकेतील दोन्ही लाचखोरांच्या घरांची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपअधीक्षक नाळे यांच्यासह निरीक्षक बापू साळुके, हवालदार विकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, पूनम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.