Sangli: दारूसाठी पैसे न दिल्याने पुतण्यानेच केला वृद्धाचा खून, हल्लेखोराची कबुली

0
64

मांगले (ता.शिराळा) येथील धनटेक वसाहतीत राहणाऱ्या रामचंद्र कोंडीबा सुतार (वय ६०) यांचा पुतण्यानेच दारूसाठी पैसे न दिल्याने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासाच्या दरम्यान संशयित संदीप श्यामराव सुतार यांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती शिराळा पोलिसांनी दिली.

राशिवडे (ता.राधानगरी, जि.कोल्हापूर) येथील रामचंद्र सुतार तीस वर्षांपूर्वी मजुरीच्या निमित्ताने मांगले येथे स्थायिक झाले. ते परिसरातील एका लाकूड वखारीत कामास होते.

जवळच असलेल्या धनटेक वसाहतीमध्ये घर बांधून ते पत्नीसह राहत होते. गुरुवारी दुपारी चार वाजता मणदूर (ता.गगनबावडा) येथील त्यांच्या मेहुणीचा मुलगा संदीप हा वीस वर्षांनंतर घरी आला होता.

पाहुणचार, चर्चा झाल्यानंतर दोघेही बाहेर फिरण्यास गेले, तर रामचंद्र यांच्या पत्नी इंदुबाई या वारणा रस्त्याशेजारील ढाब्यावर कामासाठी निघून गेल्या. रात्री नऊच्या सुमारास त्या काम संपवून घरी आल्यानंतर पती रामचंद्र रक्ताच्या थाराेळ्यात पडले हाेते. जवळच एक दगड पडला हाेता. खून केल्यानंतर संशयित संदीप सुतार त्यांच्याच घरात आतून कडी लावून झोपून होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, रात्री उशिरा शिराळा पोलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक जयसिंग पाटील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, घराचा दरवाजा मोडून पाेलिसांनी हल्लेखाेरास ताब्यात घेतले. त्यावेळी तो नशेत होता. रात्री उशिरा या प्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हल्लेखाेर संदीप हा रामचंद्र यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. त्यास नकार दिल्याने संदीपने दारूच्या नशेत दारातील दगड डोक्यात घालून त्यांचा खून केला. त्याला शुक्रवारी शिराळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमाेर हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, रात्री उशिरा इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here