पाच वर्षांपासून चकमा देणाऱ्या ठाण्याच्या ‘डॉन’ला जळगावातील वर्सी महोत्सवातून उचलले

0
72

जळगाव : ठाणे, पालघर येथे दरोडे टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला जळगाव येथे आयोजित वर्सी महोत्सवातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉनचा अडीच कि.मी. पाठलाग करून पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पकडले. ही कारवाई शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली.

प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. त्याच्यावर दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते.

प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात असल्याची माहिती जळगावील एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकॉ अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे वर्सी महोत्सवात पोहचले. त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने पळ काढला. त्या वेळी वरील पथकाने त्याचा अडीच कि.मी. पळत जाऊन पाठलाग केला व त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.

लोकेशन व कोणतीही माहिती नसताना हेरले

प्रथमेश हा दरोडा व इतर गुन्हे करायचा. तो मोबाईलदेखील सोबत ठेवत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध लागणे कठीण होत होते. यातूनच तो पाच वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागत न्वहता. मात्र कोणतेही लोकेशन व इतर माहिती नसताना जळगावातून त्याला उचण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here