कोल्हापूर : कळंबा कारागृहात वारंवार गांजा आणि मोबाइल सापडतात. जिल्हा कारागृहातून कैदी पळून जातात. अशा घटनांमुळे कारागृह पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कळंबा कारागृहातील अधिका-यांना सुनावले.
कारागृहाने आयोजित केलेल्या दिवाळी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी (दि. ६) सकाळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.
कळंबा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, खेळणी, शोभेच्या वस्तू आणि फर्निचर विक्रीचा दिवाळी मेळावा सोमवारी (दि. ६) सुरू झाला. पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी कारागृहातील गैरप्रकारांवर बोट ठेवले.
‘महाराष्ट्र कारागृह पोलिसांबद्दल अलीकडे वादळ उठलेले आहे. ते वादळ शमवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे. जेलमध्ये मोबाइल पोहोचणे, ड्रग्स पोहोचणे, ललित पाटील याच्यासारखे कैदी बाहेर पडणे या घटना गंभीर आहेत.
यामुळे मलीन झालेली प्रतिमा बदलण्यासाठी कारागृह पोलिस अधिका-यांनी काम करावे,’ अशा शब्दात कान टोचण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले. तसेच कारागृह पोलिस चांगले काम करून दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कारागृह प्रशासनाने आयोजित केलेल्या मेळाव्यात दिवाळीचे खाद्यपदार्थ, टॉवेल, रुमाल, खेळणी, लाकडी आणि लोखंडी फर्निचर उपलब्ध आहे. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ खरेदी करून नागरिकांनी त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांनी केले. यावेळी कारागृहातील अधिकारी आणि कैदी उपस्थित होते.