कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारत ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याखालोखाल स्थानिक आघाड्या १८ गावांमध्ये सत्तेवर आल्या असून १४ ठिकाणी महाविकास आघाडीने विजय संपादन केला आहे.
विशेष म्हणजे करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गटाने युती करून उभ्या केलेल्या आघाडीचा ग्रामस्थांनी धुव्वा उडवला असून अपक्षांनी बाजी मारली आहे. मतदारांना गृहीत धरू नका असाच संदेश यातून दिला आहे.
गारगोटीसारख्या तालुकास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या गटाचे सरपंच निवडून आले असून बहुमत मात्र आमदार प्रकाश आबिटकर गटाचे राहिले आहे. स्थानिक पातळीवर सोयी पाहत झालेल्या वैविध्यपूर्ण युतींमुळे विजयाचे गणित मांडणेही अवघड झाले होते.