भोगावती नदीजवळील बालिंगा उपसा केंद्रातील जॅकवेल जोडणाऱ्या चॅनेलवरील मोठा चेंबर सोमवारी सकाळी कोसळला.

0
69

कोल्हापूर : भोगावती नदीजवळील बालिंगा उपसा केंद्रातील जॅकवेल जोडणाऱ्या चॅनेलवरील मोठा चेंबर सोमवारी सकाळी कोसळला. या चॅनेलमध्ये अडकलेले दगड, मलबा काढण्याचे काम सुरु असताना ही घटना घडली.

काम करण्यासाठी जमिनीपासून ५० फूट खाली चॅनेलमध्ये उतरलेले आठ कर्मचारी सुदैवाने बचावल्याने मोठी दुर्घटना टळली.

कोल्हापूर महानगरपालिका शहर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून चॅनेलमध्ये अडकलेले मोठे दगड व मलबा काढण्यासाठी खासगी ठेकेदाराचे आठ ते नऊ कर्मचारी जॅकवेलमधून पन्नास फुट खाली उतरुन भूमिगत असलेल्या चॅनेलमध्ये जाऊन हे काम करीत होते.

आठही कर्मचाऱ्यांनी चॅनेलमधील सत्तर ते ऐशी फुटापर्यंतचे दगड, मलबा काढला. थोड्या अंतरावर असलेल्या चेंबरखालील दगड काढत असताना आधीच ठिसूळ झालेला चेंबर वरुन थेट चॅनेलमध्ये खाली कोसळला. चेंबर कोसळताच सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ चॅनेलमधून पुन्हा जॅकवेलकडे येऊन सुरक्षीत वर पोहचल्याने मोठी दुर्घटना टळली.

कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस पंधरा किलोमिटर अंतरावर असलेल्या बालिंगा गावच्या हद्दीत महानगरपालिकेने १९४७ साली दगडी पाटाचा चॅनेल तयार केला आहे. त्यातून सुमारे अडीचशे मिटर अंतरावर असलेल्या जॅकवेलमध्ये पाणी आणले आहे.

गेल्या ७५ वर्षात एकदाही चॅनेलची सफाई केली नव्हती. त्यामुळे जॅकवेल जवळून पहिल्या क्रमांकाचा पन्नास फुट खोली असलेला चॅनेल ठिसूळ होऊन त्याचे दगड, मलबा खाली पडला होता. त्यामुळे जॅकवेलकडे जाणारे पाणी बंद होऊन उपसा पंप बंद पडले होते. त्यामुळे दगड व मलबा काढण्याचे हे काम हाती घेण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here