मराठी कलाविश्वाचा 80-90 चा काळ गाजवणारा हँडसम, देखणा अभिनेता म्हणजे अजिंक्य देव (Ajinkya deo). उत्तम अभिनयशैली आणि त्याहीपेक्षा त्याची जबरदस्त पर्सनालिटी या दोन गोष्टींमुळे अजिंक्य देव त्याकाळी अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला होता.
तेव्हाच कशाला आजही त्याची क्रेझ तरुणींमध्ये पाहायला मिळते. आज अजिंक्य देवने वयाची साठी गाठली आहे. पण,त्याचा फिटनेस विशीच्या तरुणाला लाजवेल असाच आहे.
त्यामुळे त्याची वरचेवर चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. अलिकडेच त्याने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने काही गोष्टींचा उलगडा केला.
आजवरच्या कारकिर्दीत अजिंक्य देवने अनेक गाजलेले सिनेमा मराठी इंडस्ट्रीला दिले. परंतु, एक काळ असा होता ज्यावेळी त्याला साईड ट्रॅक झाल्यासारखं वाटलं होतं. याविषयी त्याने पहिल्यांदाच भाष्य केलं.
विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ या जोडगोळीचा एक सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो साईड ट्रॅक झाला असं त्याने या मुलाखतीत म्हटलं.
“अॅक्शन असेल तर त्यासाठी हिंदी सिनेमा पाहायचा आणि इमोशन्स, आपले घरगुती प्रश्न सोडवणारा असं काही भावनिक असेल तर मग तो मराठी चित्रपट असायचा, असं त्यावेळी एक होतं. या ट्रान्झेक्शनमध्ये मी होतो त्यामुळे सुरुवातीला माझे पहिले काही सिनेमा चांगले चालले. त्यानंतर मग लक्ष्याची लाट आली”, असं अजिंक्य देव म्हणाला.