छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षक जोडधंदा करीत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षकांनी वेळीच सावध राहून ताबडतोब जोडधंदा बंद करावा व अध्ययन-अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे.
अन्यथा, दोषींविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जाहीर केला आहे.
यासंदर्भात मीना यांनी सांगितले की, अशा शिक्षकांचा शोध घेण्यासाठी ८ नोव्हेंबरपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांची पथके तैनात करण्यात येणार आहेत. शिक्षकांनी फक्त शाळेच्या वेळेत मुलांना शिकवावे एवढेच नाही, तर त्यांनाही अभ्यास करावा लागणार आहे.
नवनवीन बदलांविषयी अपडेट राहावे लागणार आहे. परंतु काही शिक्षक जोडधंदा करीत आहेत. काहीजण नातेवाईकांच्या नावे, तर काहीजण थेट स्वत:च प्लॉटिंग, विमा, हर्बल प्राॅडक्ट किंवा अन्य धंदे करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रधान शिक्षण देण्याकडे अशा शिक्षकांचे लक्ष नाही. गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, ही बाब गंभीर आहे. दिवाळी सुट्यांनंतर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अथवा गावातील व्यक्तीकडे नेमलेली ही पथके चौकशी करतील.
त्यानंतर दोषी शिक्षकांविरुद्ध सेना-शर्थी कायद्यान्वये शिस्तभंगाची कारवाई करणार आहे.
आज पशुसंवर्धनची झाडाझडती
केंद्र सरकारचे निर्देश असतानादेखील ‘लम्पी’ साथरोगाचे लसीकरण केल्याचे रेकॉर्ड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने ठेवलेले नाही. यासंदर्भात सातत्याने सूचना दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शासनाकडून पुरवठा झालेल्या लसीकरणाच्या एकूण ‘डोस’पैकी अवघ्या ३८ टक्के नोंदी आढळून आल्या आहेत; मग, उर्वरित ‘डोस’ गेले कुठे? बाधित जनावरांचे लसीकरण केलेले असेल तर ‘ॲनिमल टॅगिंग नंबरसह’ त्याच्या ऑनलाइन नोंदी का करण्यात आलेल्या नाहीत, याचा आढावा घेण्यासाठी उद्या मंगळवारी या विभागाचा आढावा घेतला जाणार असून, दोषींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.