कोल्हापूर : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाविरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांची ऱाज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मंगळवारी दसरा चौकात झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलकांनी केली आहे.
दसरा चौकात आज, बुधवारी दुपारी बारा वाजता निषेध म्हणून भुजबळांच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन करण्यात येणार असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे समन्वयक वसंतराव मुळीक आणि ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले.
भुजबळांनी मराठा समाजाविषयी केलेल्या विधानांमुळे आक्रमक सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बाबा पार्टे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार राजी असताना त्यांचे मंत्री छगन भुजबळ वेगळी भाषा करतात, त्यामुळे त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना फसविले ते मंत्रीमंडळात असतानाही सरकारविरोधात भूमिका घेतात याचा जाहीर निषेध आहे. त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा.
वसंत मुळीक म्हणाले, मनोज जरांगे पाटील आता गल्लीबोळातील नेते नाहीत तर ते मराठ्यांचे नेते आहेत. त्यांना भेटायला आलेल्या माजी न्यायमूर्तींनी त्यांचा उल्लेख सर असा केला असेल तर त्याला भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही.
राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय सर्व मंत्र्यांना बंधनकारक असतो, त्यामुळे आरक्षणाबाबत निर्णयाविरोधात वक्तव्य करणाऱ्या भुजबळांना मराठ्यांचा राग आहे हे दिसून येते. मराठा समाज त्यांना केवळ नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
दिलीप देसाई म्हणाले, सामान्य राजकीय कार्यकर्त्यांने अशाप्रकारचे विधान करणे समजून घेता येईल, मात्र सर्व जातीधर्माचा सन्मान करण्याची शपथ घेतलेल्या मंत्र्यांकडून हे अपेक्षित नाही, सरकारने त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.
ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, भुजबळांसारखे मातब्बर मंत्री सरकारच्याच निर्णयाविरोधात बेताल, बेजबाबदार, दोन जातींत दुफळी माजवणारे आणि शांतता भंग करणारे वक्तव्य करतात. ते भाजपच्या हातातील किल्लीचे खेळणे बनले आहेत.
ईडीची भीती दाखवून ते त्यांच्या स्क्रिप्टनुसारच वक्तव्य करायला लावत आहेत. १९६७ मध्ये यादीत नसताना भुजबळांच्या सांगण्यावरुन १९६८ मध्ये माळी समाज व पाटजाती यादीत कशी आली याचा खुलासा सरकारने करावा.
या पत्रकार परिषदेला शारंगधर देशमुख, उदय लाड, अवधूत पाटील, चंद्रकांत पाटील, फिरोज खान उस्ताद, संजय पटकारे, सुनीता पाटील, गीता हसूरकर उपस्थित होते.