कोल्हापूर : कार्यारंभ आदेश देऊनही रस्त्यांची कामे न करणाऱ्या तसेच दायित्व कालावधीत खराब झालेले रस्ते दुरुस्त न करणाऱ्या ठेकेदारांविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महानगरपालिकेसमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
महापालिका कोणाच्या इशाऱ्यावर चालते? कामे न करणाऱ्या ठेकेदारांचे एवढे लाड का करता? असे प्रश्न सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विचारले.
शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महापालिकेसमोर आंदोलन झाले.
प्रचंड घोषणाबाजी करत मुख्य कार्यालयाचे मुख्य दरवाजा ढकलून पदाधिकारी, शिवसैनिकांनी महापालिका कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांची भेट घेऊन शहरातील खराब रस्त्याबाबत जाब विचारला.
शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. अधिकाऱ्यांनी चार चाकीतून फिरण्यापेक्षा दुचाकीवरुन शहरातून प्रवास केल्यास त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील अशा शब्दात महापालिकेच्या कामकाजाचा समाचार घेतला.
‘महापालिका कायद्यानुसार चालते की कोणाच्या इशाऱ्यावर, असा सवाल करतानाच कामे जमत नसेल तर दोघांनीही राजीनामा द्या’ अशी मागणी संजय पवार यांनी केली.
शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे का होत नाहीत ? अधिकारी सक्षमपणे कामे करत नाहीत, अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. जे ठेकेदार कामे करत नाहीत त्यांना तात्काळ ब्लॅक लिस्ट करा, अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी केली.
वारंटी कालावधीतील रस्त्यांची कामे न केलेल्या सात ठेकेदारांना तत्काळ ब्लॅक लिस्ट करा आणि ते जाहीर करा अशी मागणीही त्यांनी केली.
आज, बुधवारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महापालिकेचे अधिकारी यांनी संयुक्तपणे शहरातील रस्त्यांची पाहणी करण्याचे ठरले.मिरजकर तिकटी येथून दुचाकीवरुन या पाहणीचा सुरुवात होईल.