Kolhapur: पैसे खायला नाही, कामासाठी नेमलंय; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना झापले

0
86

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्लाबोल केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यावर हल्लाबोल करण्याचा इशारा बुधवारी दिला.

पैसे खाण्यासाठी तुम्हाला सल्लागार नेमलेले नाही तर अमृत योजनेची कामे करून घेण्यासाठी नेमले आहे, अशा शब्दात उपनेते संजय पवार यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना झापले.

शहरातील खराब रस्त्याबाबत शिवसेना गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा समाचार घेतल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

मिरजकर तिकटी ते बजापराव माने तालीम पर्यंतच्या रस्त्याची पाहणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका तसेच प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. रिस्टोरेशनची कामे नसल्याने संतप्त झालेल्या संजय पवार, विजय देवणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरवात केली.

27 किलोमीटर रस्त्यावर रेस्टोरेशन पूर्ण झाले नाही, का केले नाही अशी विचारणा पवार यांनी केली. ठेकेदाराकडून कामे करवून घेण्यासाठी तुम्हाला सल्लागार नेमले आहे, नुसते पैसे खाण्यासाठी नाही. कशाला ठेकेदाराचे लाड करताय, अशा शब्दात पवार यांनी अधिकाऱ्यांना झापले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, अमृत योजनेचे तुषार दांडगे, सहाय्यक अभियंता जीवन प्राधिकरण योगेश उलपे, यांच्यासह शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, महेश उत्तुरे, दिनेश साळुखे, सचिन मांगले, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, मंजित माने, अभिजित बुकशेठ उपस्थित होते.

महापालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन

वर्क ऑर्डर दिलेली रस्त्यांची कामे लवकरसुरु करण्याचे तसेच रिस्टोरेशन ची कामे लवकरात लवकर पूर्ण करून घेतली जातील, असं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here