राजस्थानमधील सलूंबर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे विजेच्या धक्क्यापासून एकमेकांना वाचवताना संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाला विजेचा धक्का बसला, त्याची पत्नी त्याला वाचवण्यासाठी पुढे आली, पण तिलाही विजेचा धक्का बसला.
यानंतर दोन्ही मुलं आई-वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांनाही शॉक बसला. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुःखद घटना सलंबूर जिल्ह्यातील ढिकिया गावातील कुन भागात घडली. येथे 68 वर्षीय ऊंकार मीना यांच्या घरासमोर लोखंडी गेट बसवण्यात आला आहे.
गुरुवारी या गेटमधून करंट वाहत असताना ऊंकार यांना त्याचा फटका बसला. ऊंकार यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी भंवरी मीना मदतीसाठी धावली, मात्र तिलाही शॉक बसला.
आई-वडिलांना विजेचा धक्का लागल्याचं पाहून ऊंकार आणि भंवरी यांचा मुलगा देवीलाल तसेच मुलगी मंगी हे दोघांना वाचवण्यासाठी पुढे आले. ऊंकार आणि भंवरी यांच्या दोन्ही मुलांनाही विजेचा धक्का बसला आणि चौघांचाही तिथेच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन दाखल झाले आणि त्यांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शवागारात पाठवले. याशिवाय या घटनेचाही तपास सुरू आहे.
5 सप्टेंबर 2023 रोजी कानपूर, यूपी येथेही विजेचा धक्का लागल्याची अशीच घटना समोर आली होती. येथे हाय टेंशन लाईनच्या संपर्कात आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला होता, ज्यामध्ये त्या तरुणाचा मृतदेह विजेच्या ताराच्या संपर्कात आल्यानंतर बराच वेळ जळत होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.