४० हजार नसल्याने कुणबी दाखले मिळाले नाहीत, कोल्हापुरातील सकल मराठाचा आरोप

0
68

कोल्हापूर : कुणबी दाखला काढण्यासाठी ४० हजार रुपये नसल्याने अनेक सर्वसामान्य, गरीब दाखल्यापासून वंचित राहिल्याचा आरोप गुरुवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासमोर केला.

यापूर्वीच कुणबीच्या नोंदी शोधून दाखले दिले नसल्याने एका पिढीचे नुकसान झाले आहे. यामुळे शासन, प्रशासनाचा निषेधही त्यांनी नोंदवला. यावेळी शिष्टमंडळातर्फे कुणबी नोंदी शोधण्यासाठी जादाचे मुनष्यबळ द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, कुणबीच्या नोंदी असूनही दाखल्यासाठी चाळीस हजार देणे शक्य नसल्याने अनेकांनी दाखला काढला नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत कुणबीच्या पाच हजार नोंद मिळाल्या आहेत. ही संख्या फार कमी आहे. जिल्ह्यातील ८० टक्के मराठा कुणबी होता.

मात्र, १९३२ मध्ये जगद्गुरू यांनी केलेल्या आवाहनानुसार मराठा अशी नोंद केली आहे. यामुळे कुणबीच्या नोंदी शोधताना याचा कटाक्षाने विचार करावा.

कुटुंबात एकाची कुणबीची नोंद मिळाल्यास सर्वांना दाखला मिळावा. नोंदी शोधण्यासाठी मोडीची कागदपत्रे वाचणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. ‘कु’ म्हणून असलेल्यांच्याही नोंदी घ्याव्यात. शहरासह प्रत्येक तालुक्यात कुणबीच्या नोंदी मोठ्या संख्येने मिळणार आहेत. त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड करावी.

ॲड. इंदूलकर म्हणाले, यापूर्वीच कुणबीची नोंद शोधून पात्र असणाऱ्यांना दाखला देणे अपेक्षित होते. आता आंदोलनामुळे शासन उशिरा जागे झाले आहे. याआधी ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कुणबी दाखले देण्यास दिरंगाई केली आहे, त्यांची खातेनिहाय चौकशी करावी.
दिलीप देसाई यांनी नोंदी शोधण्याचे काम गतीने करण्याची मागणी केली. यावेळी बाबा पार्टे, सुनीता पाटील, शैलजा भोसले, उदय लाड, महादेव जाधव, विलास देसाई आदी उपस्थित होते.

शाब्दिक चकमक

आता कुणबीच्या नोंदी शोधत आहात, याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन नव्हे, तर निषेध करण्यासाठी आलो आहोत. यापूर्वीच हे शोधून दाखले दिले असते, तर पात्र असणाऱ्यांना फायदा झाला असता, असे ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगत शासन आणि प्रशासनावर टीका केली.

यावर निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी भूतकाळात काय झाले, याचे उत्तर मी कसे देणार? अशी विचारणा केली. याच मुद्यावर उपजिल्हाधिकारी तेली आणि इंदूलकर यांच्यात खडाजंगी झाली.

असे बोलणार असाल, तर साहेबांना (जिल्हाधिकाऱ्यांना) भेटा, असे तेली यांनी सांगितले. त्यावर इंदूलकर यांनी कोण साहेब? अशी विचारणा केली.

मोडी वाचणाऱ्या ४२ जणांची नियुक्ती

कुणबीची नोंद शोधताना मोडीतील कागदपत्रांचे वाचन करावे लागत आहे. यासाठी उद्यापासूून जिल्ह्यात मोडी वाचणाऱ्या ४२ जणांची नियुक्ती केली जाईल. आणखी मनुष्यबळ वाढवून कुणबीच्या नोंदी शोधून काढण्याचे काम गतिमान केले जाईल, असे आश्वासन तेली यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here