कोल्हापूर : राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीयस्तरावर कुस्ती, फुटबाॅल, नेमबाजी आणि जलतरण यासह अन्य खेळांतही कोल्हापूरकर खेळाडूंचा सहभाग वाढू लागला आहे.
नुकत्याच गोव्यात झालेल्या नॅशनल गेम्सअंतर्गत जलतरण स्पर्धेत कोल्हापूरचा ऑलंपियन वीरधवल खाडे याने वैयक्तीक ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये स्वत:चाच एक विक्रम मोडला.
तर पत्नी ऋजुतासह तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकाची कमाई केली.
पणजीतील कंपाल येथे झालेल्या या स्पर्धेत वीरधवलने २०१५ साली येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत २४.७३ इतकी वेळ नोंदवित ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये विक्रम नोंदविला होता.
हा विक्रम त्याने या स्पर्धेत २०२३ साली पुन्हा २४.६० इतकी वेळ नोंदवित आपलाच विक्रम मोडीत काढला. त्याने या स्पर्धेत ५० मीटर फ्रीस्टाईल व बटरफ्लायमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण, तर पत्नी ऋतुजा हिने ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये एक सुवर्ण व बटरफ्लायमध्ये एक कांस्य पदक पटकाविले. यासोबतच कोल्हापूरच्याच पूजा कुमरे-आळतेकर हिने महाराष्टाच्या वाॅटरपोलो संघातून प्रतिनिधीत्व करीत कांस्य पदक मिळवून देण्यात बाजी मारली.
एकूणच राज्य जलतरण संघाने या स्पर्धेत जलतरण डायविंग व वाॅटरपोलो मध्ये ७ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २३ पदकांची कमाई केली.
या संघासाठी कोल्हापूरचेच व राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने व सचिव आणि राष्ट्रीय जलतरण संघटनेचे निमंत्रक राजेंद्र पालकर, प्रशिक्षक अरुणकुमार मिश्रा, विलास देशमुख, बालाजी केंद्रे, कैलाश आखाडे, नीळकंठ आखाडे यांचे मार्गदर्शन व राज्य जलतरण संघाचे व्यवस्थापक अजय पाठक यांनी विशेष परिश्रम केले. विशेष म्हणजे जलतरणात कोल्हापूरकरांचे वर्चस्व वाढू लागले आहे.
केवळ नॅशनल गेम्स मधून तो खेळणार नाही
वीरधवल खाडे याने २०१५ मध्ये नॅशनल गेम्स मध्ये सुवर्ण मिळवून पदार्पण केले होते. त्याने २०२३ मध्ये ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. या विक्रमानंतर त्याने या स्पर्धेत यापुढे न खेळण्याचे ठरविले आहे. तर तो अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळणार आहे. असे त्याने स्पष्ट केले.