कुरुंदवाड : हिवाळ्याच्या सुरुवातीलाच पंचगंगा नदीला काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी आले असून दूषित पाण्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे.
त्यामुळे प्रदूषित पाण्याचा प्रश्न आतापासूनच सुरू झाला असून दूषित पाण्याचा त्रास पुढील वर्षातील मान्सूनच्या आगमनापर्यंत सोसावा लागणार आहे.
त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, तेरवाड बंधारा येथे नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याचे समजताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड व अंकुश पाटील यांनी बंधाऱ्यावर येऊन पाहणी केली व दूषित पाण्याचा पंचनामा करून पाण्याचे नमुने घेतले.
नदी दूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालीघाटे व बंडू पाटील यांनी अधिकारी हरबड यांना दिले.
पाण्याअभावी गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदी कोरडी पडली होती. त्यामुळे अनेक शेतकरी, सहकारी संस्थांचे शेतीपंप बंद पडले होते. शेतीसाठी धरणांतून पाणी सोडण्याची शेतकरी वर्गातून मागणी होत होती.
बुधवारी नदीपात्रात पाणी आल्याने नदीपात्र तुडुंब भरले. मात्र धरणांतील पाण्याच्या प्रवाहाबरोबर औद्योगिक वसाहतीतून रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया सोडल्याने नदीपात्रातील पाणी दूषित झाले आहे.
प्रदूषित पाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मृत माशांचा खच तेरवाड बंधाऱ्यावर येऊन तटला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाईचा बडगा उगारून नदीचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे. यावेळी विश्वास बालीघाटे, बंडू पाटील, संजय मालगावे, रावसाहेब लठ्ठे, अरविंद सासणे उपस्थित होते.