ऐन दिवाळीत घरात खून; पतीने दारूच्या नशेत झोपलेल्या पत्नीला डोक्यात लाकूड घालून संपवले

0
68

पाचोड: दिवसभर दारू पिऊन रात्री घरी आल्यानंतर स्वयंपाक न बनविल्याने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडाने जोरदार प्रहार करून तिचा खून केल्याची घटना पैठण तालुक्यातील हर्षी येथे रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

प्रियंका श्रीराम वाघ ( ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

हर्षी येथील श्रीराम वाघ हा सेंट्रिंगकाम करत होता. दारूचे वेसन असल्याने त्याने काही दिवसांपूर्वी हे कामही सोडले होते. त्यामुळे त्याचा पत्नी प्रियंकासोबत नेहमी वाद होत होता.

रविवारी एकीकडे सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा दिवस असताना श्रीराम वाघ हा दिवसभर दारू पिऊन तर्रर होता. त्यामुळे प्रियंकाने माहेरी आईला फोन करून आज सणाच्या दिवशीही श्रीराम दारू पिऊन फिरत असल्याचे सांगितले. त्यांनी १३ वर्षीय मुलगी व ७ वर्षाचा मुलगा यांना दिवाळीसाठी माहेरी पाठविले होते. त्यामुळे प्रियंकाने रात्री घरात स्वयंपाकच केला नाही.

दिवसभर बाहेर फिरून श्रीराम वाघ हा रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याला घरात स्वयंपाक केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तो रागात हातात लाकूड घेऊन पत्नी प्रियंका झोपलेल्या खोलीत गेला.

त्यानंतर स्वंयपाक का केला नाही, म्हणून झोपेतच तिच्या डोक्यात लाकडाने जोरदार प्रहार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मित्राचे वाहन बोलावून घेत त्यामध्ये टाकून पत्नीचा रक्तबंबाळ झालेला मृतदेह घेऊन तो पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री ९.३० वाजता दाखल झाला. येथे त्याने पत्नी दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सपोनि संतोष माने कर्मचाऱ्यांसह रूग्णालयात दाखल झाले. यावेळी आरोपीने सांगितलेल्या माहितीबाबत पोलिसांना संशय आला.

कारण मयत महिलेल्या डोक्यात गंभीर जखमा दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर घटनास्थळी श्वानासह आरोपीस नेण्यात आले. तेथे श्वानाला रक्त असलेले लाकूड दिसले. त्यानंतर लाकडास हुंगून श्वान आरोपीच्या जवळ जाऊन थांबले. त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला.

मृत विवाहितेचे नातेवाईक आक्रमक
इकडे मृत विवाहितेचे माहेरकडील नातेवाईक दवाखान्यात दाखल झाले. त्यांनी आरोपीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली.

त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मृत प्रियंकाच्या भाऊ सचिन पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्रीराम वाघ याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सपोनि संतोष माने, उपनिरीक्षक नितीन काकरवाल, जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पवन चव्हाण करत आहेत. दरम्यान,मृत प्रियंकाच्या पार्थिवावर सायंकाळी हर्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रियंकाच्या पश्चात सासरे, सासू, नवरा, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here