मोटरसायकलचा आवाज अन् मालकाच्या इशाऱ्यावर धावल्या म्हैशी, शर्यती पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी

0
78

कोल्हापूर : हलगीचा कडकडाटात आणि सायलेंन्सर काढलेल्या मोटरसायकलीचा आवाजामागे धावणाऱ्या, शिंगे रंगविलेल्या, मोराचा पिसारा लावून नटवलेल्या आणि दागिन्यांनी मढवलेल्या म्हैशी आणि त्यापाठोपाठ म्हैशींच्या उत्साही मालकांची गर्दी असे चित्र दिवाळी पाडव्यादिवशी कोल्हापूरात होते.

दरम्यान या शर्यंतीवेळी आमदार सतेज पाटील यांनी स्वत: दुचाकी चालवून प्रोत्साहन दिले.

बैलपोळा सोडला, तर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या जनावरांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी दुसरा असा दिवस नसतो; पण जनावरांवर प्रेम कसे करावे, याचा अनुभव घ्यायचा असेल तर तो कोल्हापुरात दिवाळीतच मिळतो.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामधील विविध गावांमध्ये म्हैशींच्या शर्यती घेतल्या जातात. यंदाही कोल्हापूरातील सागरमाळ येथे रेड्याची टक्करीजवळ म्हैशी आणि रेड्यांचा रिंगण सोहळा पार पडला.

कसबा बावडा, शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, पाचगाव या ठिकाणीही पार पडलेल्या शर्यती पाहण्यासाठी शहरवासीयांनीही मोठी गर्दी केली होती. मालकांच्या इशाऱ्यावर गौरी, पतंग, बुलेट, बावरी अशी नावे असलेल्या या म्हैशींनी केलेल्या कसरतीने पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडले.



सागरमाळ येथे सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी आणि सागरमाळ रेड्याची टक्कर आयोजित रेड्यांचा आणि म्हैशींचा रिंगण सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, आर. के. मोरे, माजी नगरसेवक सर्जेराव साळोखे, काकासाहेब पाटील, समीर कुलकर्णी, सुरेश ढोणुक्षे, उमेश पोवार, संदीप पाटील, राजू साबळे, स्वप्नील राजपूत, स्मिता मांढरे सावंत, अभिजीत जाधव आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत मंगळवार पेठ येथील नारायण चिले, नेर्ली तामगाव येथील संदीप कारंडे, जुना बुधवार पेठ येथील संदीप पाटील यांचे रेडे, वाशी येथील महादेव वाकरेकर, राजारामपुरी येथील गोगा पसारे, मिरज येथील अक्षय गवळी यांच्या म्हैशी आणि मोरेवाडी येथील अनिल मोरे, शिवाजी पेठेतील अभि मोहिते आणि उचगावातील रेडकू यांना बक्षीस देण्यात आले.

बावड्यातही उत्साह

कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळपासूनच गर्दी होती. पंचगंगा नदीवर आंघोळ घातल्यानंतर या म्हैशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम आणि विविध सामाजिक संदेश लिहिण्यात आले.

गळ्यात व पायात घुंगरांची माळ, शिंगांवर मोरपीसे, रंगीत रिबीनीने या म्हैशींना सजविलेले. सायलेंसर काढलेल्या मोठ्या आवाजाच्या मोटरसायकलच्या मागे म्हैशी सुंदर मी होणार या स्पर्धेत धावत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here