‘बिद्री’त सत्तारूढ आघाडीची धुरा सतेज पाटील यांच्यावर

0
64

कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याचा कारभार अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारचा डाग न लावता केल्याची जाणीव सभासदांना आहे. तरीही धर्म-अधर्माची लढाई सुरू आहे.

अर्जुनाच्या रूपाने ‘के. पीं’च्या हातात धनुष्यबाण दिला असून, श्रीकृष्ण म्हणून आपण व आमदार सतेज पाटील त्यांच्या सोबत असल्याने या लढाईत आम्हीच बाजी मारू. सत्तारूढ आघाडीची सर्व धुरा सतेज पाटील यांच्यावर सोपवली असून, त्यांचे राजकीय कौशल्य पाहता ते हा वेढा पार करतील, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीची घोषणा शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात केली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, वीस वर्षांपूर्वी के. पी. पाटील यांच्या हातात कारभार आला.

त्यांनी प्रत्येकवर्षी विक्रमी ऊसदर देत असतानाच २८ टक्के बोनस कर्मचाऱ्यांना देत आहेत. मागील निवडणुकीत सहवीज प्रकल्पावरून हेच विरोधक ‘के. पी. पाटील ‘बिद्री’चे पत्रे राखणार नाहीत, अशी टीका करत होते.

मात्र, याच प्रकल्पातून कोट्यावधी रुपयांचा नफा होत आहे. आता इथेनॉल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ‘बिद्री’ देशातील नंबर वनचा कारखाना होईल. हे सगळे करत असताना ‘के. पीं.’नी कोणत्याही प्रकारचा डाग अंगाला लागू दिला नाही. सर्वोत्तम दर दिल्याने त्यासाठी आरशाची गरज नाही.

कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘बिद्री’ कसा चालवला हे सभासदांना चांगले माहिती आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. त्यांच्यावर मी आता बोलणार नाही.

मतपेटीव्दारेच सभासदा त्यांना उत्तर देतील. यावेळी आमदार सतेज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, धैर्यशील देसाई, सत्यजित दिनकरराव जाधव, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील-बाचणीकर आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्षांची आदलाबदल

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आमच्याकडे आले तर आमचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील विरोधात गेले. त्यामुळे जिल्हाध्यक्षांची आदलाबदल झाल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

‘ए. वाय.’ यांच्यावरील प्रेम पातळ

सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पक्षीय राजकारण वेगळे असते, हे जरी खरे असले तरी ए. वाय. पाटील यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. हे सगळे जड असले तरी त्यांच्यावरील प्रेम पातळ झाले हे निश्चित आहे. ठीक आहे, राजकारणात जे येतील त्यांना घेऊन व येणार नाहीत त्यांना सोडून लढाई करावी लागते, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

हे आहेत आघाडीचे नेते..

पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here