कोल्हापूर :भोगावती कारखाना निवडणूक मतदान चुकीचे नोंदवल्यावरुन मतमोजणीवेळी गोंधळ

0
58

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भाेगावती सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ पासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात सुरु झाली.

राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथील केंद्रावर मोजणी सुरु असताना विरोधी परिवर्तन आघाडीच्या उमेदवाराला पडलेले मत मोजणी कर्मचाऱ्यांनी सत्तारुढ आघाडीचे उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावावर नोंदवल्याने गोंधळ उडाला.

यावेळी मतमोजणी थांबवण्याची मागणी विरोधी आघाडी घेत मोजणी कर्मचारी म्हणून विकास संस्थांचे सचिव नको, असा आग्रह धरला आहे.

‘भोगावती’साठी काल, रविवारी चुरशीने ८६.३३ टक्के मतदान झाले होते. तिरंगी लढत असली तरी निवडणूकीत विरोधकांनी चांगलीच हवा निर्माण केल्याने मोजणी प्रक्रियेकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळी आठ वाजता मोजणीस सुरुवात झाली. एकूण ३६ टेबलांवर मतदान केंद्र १ ते ३६ ची मोजणी सुरु करण्यात आली. साधारणता अकरा वाजता तरसंबळे येथील केंद्रावरील मोजणीवेळी विरोधी आघाडीच्या एका उमेदवाराचे मत मोजणी कर्मचाऱ्यांने सत्तारुढ आघाडीच्या उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावावर नोंदवल्याचे निदर्शनास आल्याने उपस्थित मोजणी प्रतिनिधींनी हरकत घेतली.

त्यांनी मोजणी प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी करत विकास संस्थांचे सचिव मोजणी कर्मचारी नको असा आग्रह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धरला. यामुळे मोजणी ठिकाणी काही काळ गोंधळ उडाला. मात्र, मोजणी थांबवण्याची मागणी फेटाळून लावत मोजणी प्रक्रिया सुरुच ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here