आजरा : आवंडी धनगरवाडा क्र. ३ (ता. आजरा) येथे पट्टेरी वाघाने पाळीव जनावरांवर हल्ला केला. त्यामध्ये धुळू धोंडिबा कोकरे यांचा बैल ठार झाला. ही घटना धनगरवाडा व सुळेरानच्या जंगल क्षेत्रात शनिवारी सायंकाळी घडली.
दोन महिन्यांपूर्वी पट्टेरी वाघाने याच धनगरवाड्यावरील जगू कोकरे यांच्या बैलावर हल्ला केला होता. काल पुन्हा वाघाने हल्ला केल्यामुळे धनगरवाड्यावर भीतीयुक्त वातावरण आहे.
धनगरवाड्यावरील धुळू कोकरे आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगलात गेले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघाने जनावरांवर हल्ला केला. पट्टेरी वाघाने बैलाला पकडून ओढत नेले.
यावेळी अन्य जनावरेही वाघावर धावून गेली व धुळू कोकरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे अर्ध्या तासानंतर त्याठिकाणी जखमी अवस्थेत बैलाला वाघाने सोडून दिले.
त्यानंतर जखमी अवस्थेतच उपचारासाठी कोकरे यांनी बैलाला घरी आणले. रात्री उशिरा कोल्हापूर येथून वन विभागाची रेस्क्यू टीम धनगरवाड्यावरील जंगलात दाखल झाली.
त्यांनी ड्रोन सोडून पट्टेरी वाघाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो सापडला नाही. वन विभागाचे वनपाल संजय नीळकंठ, वनसेवक गंगाराम कोकरे, प्रवीण बेलवळेकर यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.