कोल्हापूर : टाकाळा परिसरातील एस.व्ही. एन्टरप्रायझेस शेअर ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख सिद्धार्थ राजू वाझे (वय २६, रा. शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) हा गुरुवारी (दि. १६) सकाळी ऑफिसला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला.
तो अद्याप घरी परतला नाही. दोन्ही मोबाइल ऑफिसमध्ये ठेवून मुलगा बेपत्ता झाल्याने वडील राजू नायकू वाझे (वय ५५) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ वाझे याने वर्षभरापूर्वी टाकाळा येथे एका अपार्टमेंटमध्ये एस.व्ही. शेअर ट्रेडिंग कंपनी सुरू केली. तो रोज सकाळी दहाच्या सुमारास ऑफिसमध्ये जात होता आणि सायंकाळी परतत होता.
गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी तो ऑफिसमध्ये जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने वडिलांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचे दोन्ही मोबाइल बंद लागत होते.
अखेर वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद राजारामपुरी पोलिसांत दिली. दुसऱ्या दिवशी वडिलांनी बनावट चावीने एस.व्ही. एन्टरप्रायझेसचे ऑफिस उघडून पाहिले असता, फ्लाइट मोडवर टाकलेले सिद्धार्थचे दोन्ही मोबाइल मिळाले.
अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने हृदयविकाराचे रुग्ण असलेल्या वडिलांना धक्का बसला असून, वाझे कुटुंबीय चिंतेत आहे.
कारण काय?
सिद्धार्थ वाझे बेपत्ता होऊन चार दिवस उलटले आहेत. पोलिसांना अजूनही त्याचा ठावठिकाणा मिळालेला नाही. तो अचानक का निघून गेला? त्याला शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान झाले होते काय?, त्याच्यावर कोणाचा दबाव होता काय? अशा अनेक कारणांची चर्चा सध्या सुरू आहे.