Sangli: मनोज जरांगे-पाटलांच्या रॅलीतून रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांची टोळी जेरबंद, दीड लाखाची रक्कम जप्त

0
114

विटा : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या सांगली जिल्हा दौऱ्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या खिशातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ९ सराईत चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात विटा पोलीसांना काल, रविवारी यश आले.

यावेळी पोलीसांनी चोरट्यांकडून १ लाख ३९ हजार २०० रूपयांची रोकड जप्त केली आहे.

याप्रकरणी सूरज उध्दव पवार (वय २७), रमाकांत आनंदा कांबळे (वय ३६), आकाश साहेबराव वाघमारे (वय २४), राजेश विठ्ठल शाहीर (वय ३४), अविनाश लालासाहेब कांबळे (वय २७), दत्ता लालासाहेब कांबळे (वय २८), अक्षय शिवाजी सनमुखराव (वय ३४), विलास लक्ष्मण शिंदे (वय २६, सर्व रा. राजीवनगर, लातूर, जि. लातूर) व बिलाल गुलाब नबीखान (वय ५४, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या ९ संशयितांची नावे आहेत.

मनोज जरांगे-पाटील हे दि. १७ नोव्हेंबरला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मायणी ते सांगली राज्यमार्गावरून येताना मराठा कार्यकर्त्यांनी अनेक गावात त्यांचे जंगी स्वागत केले. त्यावेळी प्रत्येक गावात ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

नागेवाडी (ता.खानापूर) येथे झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन सरपंच सतीश निकम यांच्यासह सहा जणांच्या खिशातून या चोरट्यांनी सुमारे ७८ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केली.

त्यानंतर विटा येथील जाहीर सभेवेळी याच चोरट्यांनी एकाच्या खिशातून १८ हजार रूपये तर तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे गर्दीचा फायदा घेऊन याच टोळीने तिघांच्या खिशातून ४४ हजार रूपयांची रोकड लंपास केली.

याप्रकरणी विटा व तासगाव पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता. विटा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार विटा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला रविवारी विटा बसस्थानक परिसरात ७ ते ८ इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांना ताब्यात घेतले.

त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यावेळी नागेवाडी, विटा व शिरगाव येथून रोकड लंपास केल्याची कबुली दिली. याप्रकरणी लातूर जिल्ह्यातील ९ सराईत चोरट्यांच्या टोळीला विटा पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील १ लाख ३९ हजार २०० रूपयांची रोकड जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here