अंबानी-अदानी तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी!; गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा धडक मोर्चा

0
83

 अंबानी-अदानी मांडीवर, शेतकरी मात्र वाऱ्यावर, अंबानी-अदानी तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी, अन्यायी- जुलमी पाणीपट्टी, जलमापक यंत्राची सक्ती मागे घ्या, अश्वशक्तीऐवजी मीटरप्रमाणेच वीज बील आकारणी करा, दुष्काळी गडहिंग्लज तालुक्यातील संपूर्ण पाणीपट्टी व वीजबीले माफ करा, अशा जोरदार घोषणा देत तालुक्यातील शेतकऱ्यांनी गडहिंग्लजमध्ये काढलेला ऐतिहासिक मोर्चा लक्षवेधी ठरला.

गडहिंग्लज विभाग कृषीपंपधारक अन्याय निवारण शेतकरी संघर्ष समितीतर्फे येथील पाटबंधारे व महावितरणच्या विभागीय कार्यालयांसह प्रांतकचेरीवर हा मोर्चा काढण्यात आला.

येथील गांधीनगरातील गणेश मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. पाटबंधारे व महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर प्रांतकचेरीच्या आवारात मोर्चाची सांगता झाली.

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, माजी सभापती अमर चव्हाण, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कॉ.शिवाजी गुरव, कॉ.संजय तर्डेकर यांची भाषणे झाली.

मोर्चात माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई,दिग्विजय कुराडे,मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने,किसान संघाचे बाळगोंडा पाटील, राजू मोळदी, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, सुजित देसाई, मल्लिकार्जुन आरबोळे, वसंत नाईक आदींसह कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाणीपट्टी वसुली जुन्यादरानेच !

चालू वर्षांतील कृषीपंपाच्या पाणीपट्टीची वसुली जुन्या दरानेच केली जाईल,असे लेखी तर अन्य स्थानिक प्रश्नांसंदर्भात अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबरला गडहिंग्लजमध्ये बैठक घेण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम यांनी दिले.यावेळी उपअभियंता अविनाश फडतरे उपस्थित होते.

कृषीपंपाची वीज तोडणार नाही!

‘गडहिंग्लज’चा समावेश दुष्काळी तालुक्यात झाल्याने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी कृषीपंपाची वीज तोडली जाणार नाही.तसेच वीज बिलात दुरुस्ती करून शासन निर्णयानुसार ३३ टक्के सवलत दिली जाईल, अशी ग्वाही ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी दिली.

‘भस्मासूरा’ला शेतकऱ्यांचा लगाम!

‘मनसे’चा गडहिंग्लज शहर उपाध्यक्ष अभिजित किर्तीकर हा भस्मासूराच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी झाला होता. त्याच्या गळ्यात ‘पाटबंधारे- महावितरण भस्मासूर’ असा फलक होता. मात्र,त्याच्या हातातील दोऱ्यांच्या लगाम शेतकऱ्यांच्या हाती होता.त्याची गडहिंग्लज परिसरात विशेष चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here