कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, उपतालुकाप्रमुख के. के. राजगिरे, विभागप्रमुख बाबुराव बसरवाडकर, अरविंद बुजरे, युवासेना तालुका समन्वयक राहुल जरग यांना पक्षादेश न पाळणे व पक्षविरोधी भूमिका घेतल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पदमुक्त करण्यात आले.
बुधवारी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपनेते संजय पवार यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली. बिद्रीच्या निवडणुकीत या कार्यकर्त्यांनी विरोधी आबिटकर आघाडीस त्यांनी पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने तातडीने ही कारवाई केली आहे.
बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार के पी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महालक्ष्मी आघाडी आणि आमदार प्रकाश आंबिटकर, संजय मंडलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडीमध्ये लढत होत आहे.
दोन्ही आघाडीकडून प्रचाराला सुरुवात झाल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी गटातील नेते पाहुणे के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेला आहे.