कोल्हापूर : गतवर्षी गाळप केलेल्या उसाचा दुसरा हप्ता देण्याच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी कोल्हापुरातील पुणे-बंगळूरू महामार्ग रोखला.
पोलिसांचा विरोध झुगारुन शेकडो शेतकऱ्यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. महामार्ग रोखल्याने वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी रात्री स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.मात्र, तरीही या दडपशाहीला विरोध करत हजारो शेतकरी महामार्गावर उतरले. स्वत: राजू शेट्टी यांनीही अंबाबाईचे दर्शन घेऊन चक्काजाम आंदोलनात भाग घेतला.
महामार्ग रोखल्याने वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली.
मागील हंगामात गाळप केलेल्या उसाला १०० रुपये द्या अशी मागणी करत स्वाभिमानीने एक पाऊल मागे घेतले आहे. मात्र, तरीही कारखानदार याला दाद देत नसल्याने स्वाभिमानीने पुणे-बंगळूरू महामार्गावरील पंचगंगा पुलावर चक्का जाम आंदोलन केले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. तरीही त्यांना चकवा देत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी सरकारविराधोत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही शेतकऱ्यांनी आसूड ओढत सरकारचा निषेध केला.
वाठार उड्डाणपूलावर बॅरिकेड लावून वाहतूक बंद
किणी : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी सकाळच्या सुमारासच वाठार तर्फे वडगांव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपूलावर बॅरिकेड लावून महामार्गावरील वाहतूक पुर्ण बंद केली.
यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगाच रांगा लागल्या. तर राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस वाठार बसस्थानकावर थांबवण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.