Kolhapur: हाजगोळी परिसरात हत्तीचा धुमाकूळ सुरूच, ऊस लवकर उचल करण्याची मागणी

0
77

चंदगड : गेल्या काही दिवसांपासून हाजगोळी, नगरगाव, धामणे परिसरात असलेल्या हत्तीने बुधवारी रात्री आपला मोर्चा जंगमहट्टी, कलिवडे भागात वळविला असून ऊस, भात व नाचणी पिकाचे मोठे नुकसान सुरू आहे.

एकीकडे ऊस आंदोलन तर दुसरीकडे हत्तीकडून ऊस पिकाचा फडशा सुरू असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याने या परिसरातील ऊस उचल त्वरित करावी, अशी मागणी सरपंच अस्मिता कदम यांनी केली आहे.

जंगमहट्टी धरण परिसरात हत्ती तळ ठोकून असून बुधवारी रात्री त्याने जोतिबा कदम, दत्तू भोगूलकर, देवानंद कदम, गुंडू गावडे, विठ्ठल पाटील, गोपाळ गावडे यांच्या ऊस, भात व नाचणी पिकाचे मोठे नुकसान केले आहे.

ऊस आंदोलन व हत्ती उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून हतबल वनविभाग केवळ पंचनाम्यापलीकडे काही करत नाही. त्यामुळे या परिसरात उसाची उचल लवकर करण्यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी कारखान्यांना सूचना करावी, जेणेकरून अधिकचे नुकसान टाळता येईल, अशी मागणी सरपंच कदम यांनी त्यांच्याकडे केली आहे.

वनविभागाने ऊस उचलीसाठी प्रयत्न करावेत

ऐन सुगी हंगामात हत्तीने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी घाईला आला असून वनविभागानेच पुढाकार घेऊन या भागातील ऊस उचल लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अशोक कदम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here