गर्भारपणात ‘झिका’ झाल्यास बाळास जन्मजात विकृती; कोल्हापुरात पाच गर्भवतींना झिकाची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क

0
90

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर : शहरातील गर्भवतींना झिकाची लागण होत आहे. आतापर्यंत नागाळा पार्क, कदमवाडी, विचारेमाळ, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी या भागामध्ये पाच गर्भवतींना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. बाधित परिसरात घर टू घर सर्वेक्षण केले जात आहे.

आतापर्यंत शहरात ४ हजार ३२५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये १२ हजार ३६० कंटेनरची तपासणी करण्यात आली. झिका हा आजार बहुतांश प्रमाणात एडीस जातीच्या संसर्गित डासाच्या चावण्याने पसरतो. हा डास दिवसा अधिक चावतो.

आजार गर्भवती मातेकडून तिच्या गर्भाला होऊ शकतो. गर्भारपणामध्ये हा आजार झाल्यास बाळामध्ये जन्मापासून काही विकृती येण्याची शक्यता असते. अजूनपर्यंत झिका या आजारावर नेमके औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही.

झिका विषाणूने संसर्गित आजार आहे. यामुळे शहरात गर्भवती महिलांना याची लागण गतीने होत आहे. यामुळे महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्रातर्फे शहरातील गर्भवती महिलांचे सर्वेक्षण केले जात आहे.

४७६ गर्भवतींची तपासणी केली. त्यापैकी १० जणींना ताप असल्याचे आढळून आले. ४५७ गर्भवतींच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पाच जणींना झिका झाल्याचे समोर आले आहे.

आजाराची लक्षणे अशी :

ताप येणे, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी

प्रतिबंधात्मक उपाय : आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरात साचलेल्या निकामी, निरुपयोगी वस्तू नष्ट करून परिसर स्वच्छ करावा, डबकी बुजवून ती वाहती करावीत, इमारतीवरील तसेच जमिनीखालील पाण्याच्या टाक्यांना डासोत्पत्ती होऊ नये यासाठी घट्ट झाकण बसवावे.

खिडक्यांना तसेच व्हेंट पाइपला डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावेत, एडीस डास दिवसा चावत असल्याने दिवसा झोपतानादेखील मच्छरदाणीचा वापर करावा.

लक्षणे असलेल्या संशयित तापाच्या रुग्णांनी महापालिकेच्या नजीकच्या दवाखान्याशी अथवा खासगी रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आशा वर्कर्स यांना सहकार्य करावे. –डॉ. प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here