स्थलांतराची तयारी, हवी पुनर्वसनाची हमी; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकास आराखडा रुळावर

0
85

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा राबवला जावा, अशी सर्वांचीच भावना आहे. 

 जिल्हा प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना रहिवासी व व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने मंदिराचा रखडलेला विकास होण्याच्या दृष्टीने पावले पडत असल्याचे चित्र आहे.

हे करताना आमच्या शाश्वत पुनर्वसनाची हमी द्या, त्यादृष्टीने पावले उचला, आराखडा दाखवा, अशी रहिवासी व व्यावसायिकांची अपेक्षा आहे.

मिळकतींच्या संपादनाचे मोठे पाऊल उचलले जात असताना पहिल्यांदा आम्हाला विश्वासात घेतले जात आहे अशी नागरिकांची भावना आहे. दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल मागे येऊन विचार केला तर वाराणसी व उज्जैननंतर कोल्हापुरातील हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अन्य देवस्थानांसाठी आदर्श ठरणार आहे.

अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, जोतिबा रोड, भवानी मंडप, ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरातील मिळकतींचे संपादन करण्यात येणार आहे.

त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वत: आपले पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवत रहिवासी व व्यापाऱ्यांसोबत दोन वेळा रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. त्यांना तुमचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही असा शब्द दिला. या पार्श्वभूमीवर लोकमतने व्यावसायिक व रहिवाशांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

रहिवाशांना काय वाटते..?

येथे अनेक कुटुंब पिढ्यान्पिढ्यांपासून राहत असल्याने मंदिराशी भावनिक नाते आहे. मात्र काळानुरूप येथील कुटुंबांना गोंगाट, पार्किंगला जागा नाही, कूळ कायद्याची प्रकरणे, दावे यांचा त्रासही आहे.

त्यामुळे ७० टक्के रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतराची तयारी दाखवली आहे. मात्र त्यांना मिळकतींचा योग मोबदला हवा आहे. काही कुटूंबामधून देवीचे कुळाचार, नैवेद्य केला जातो त्याबाबत काही निर्णय घ्यावा लागेल.

व्यापाऱ्यांचे मत

अंबाबाईच्या सानिध्यात असलेली ही कोल्हापुरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथे वर्षानुवर्षे व्यवसाय स्थिरावला असताना दुसरीकडे नवी सुरुवात कशी करायची? तिथे व्यवसाय चालणार का? आम्ही एवढी मोठा धोका पत्करताना त्या प्रमाणत मोबदला मिळणार आहे का? आमच्या मिळकती पुढे फेरीवाले, अतिक्रमणात गेले तर त्याचा उपयोग काय असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे याच परिसरात पुनर्वसन व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपणच प्रशासनाला पर्याय द्यावेत, अशी चर्चा सुरू आहे.

एक पाऊल पुढे

मिळकतींच्या संपादनाचा विषय पहिल्यांदा २०११ साली आला, त्यावेळी कोल्हापुरात शब्दश: गदारोळ, टोकाचा विरोध झाला, त्यानंतर आता १० वर्षांनी पून्हा विषय निघाल्यानंतर सर्वांचीच पुनर्वसनाच्या दृष्टीने मानसिकता झाली आहे. संपादीत होणाऱ्या मिळकतींमध्ये रहिवासी किती, व्यावसायिक किती, त्यापैकी अंबाबाई मंदिराशी निगडीत व्यावसायिक किती असे सुक्ष्म सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. अंदाजानुसार २०० रहिवासी व ३०० ते ४०० व्यावसायिक बाधीत होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि रहिवासी, व्यापारी एकमेकांचा कल जाणून घेत आहेत. इतक्या वर्षात पहिल्यांदा खुलेपणाने चर्चा हाेऊन सकारात्मक पाऊल पुढे पडले हे महत्त्वाचे.

अजित ठाणेकर : प्रशासन आणि नागरिकांनी एक एक पाऊल मागे आल्यास व अन्य पर्यायांचा आराखड्यात समावेश झाला तर हा प्रकल्प शंभर टक्के पूर्णत्वास जाईल याची खात्री आहे. व्यापाऱ्यांच्या पुनर्वनासाठी कपिलतीर्थ मार्केटसह अन्य शासकीय वास्तूंचा विचार व्हावा.

रामेश्वर पत्की : विकास आराखड्याबद्दल सुस्पष्टता नाही, आपल्याला काय मोबदला मिळणार, पुनर्वसन कुठे होणार याबद्दल नागरिकात संभ्रम आहे.

महेश उरसाल : मंदिराशी निगडीत व्यवसाय व अन्य व्यवसाय असा भेद न करता सर्वांना समप्रमाणात मोबदला मिळावा किंवा पुनर्वसन व्हावे.

तज्ञ संस्थेची मागणी

मंदिर विकास आराखडा तयार करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तज्ञ संस्थेची मागणी केली आहे. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांची नियुक्ती झाली की ते विकास आराखडा तयार करणार आहेत. त्यानंतर खरी चर्चा सुरू होईल. पण माऊली लॉजचे संपादन हे आदर्श ठरेल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here