कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. साधारणता पंधरा मिनिटे एक सारख्या सरी कोसळत होत्या. ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने खोळंबलेल्या रब्बी पेरणीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यंदा, मान्सूनमध्येही पाऊस नाही आणि परतीचाही नाही. त्यामुळे पाणीदार जिल्ह्यात आतापासूनच नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहे. याची झळ जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्याला सोसावी लागणार आहे. गेली तीन-चार दिवस मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. उभी पिके आडवी केली आहेत, पण कोल्हापुरात केवळ ढगाळ वातावरण राहिले.
आज, मंगळवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे दिवसभरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र कोल्हापूर शहरात दुपारी नुसता शिडकावा झाला. त्यानंतर तीन वाजता जोरदार सरी कोसळल्याने हवामानात गारवा निर्माण झाला.
सध्या पावसाची गरज असून जमीनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे खरीप काढल्यानंतर शिवार मोकळी पडली आहेत. जमीनीत पाणी नसल्या विहीरांनाही पाणी कमी पडू लागले आहे. अशा परिस्थिती एक-दोन जोरदार पावसाची गरज आहे. गेल्या दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र मंगळवारी हलका पाऊसच झाला.