दुकानाच्या परवान्यासाठी घेतली लाच, कोल्हापुरात कृषी अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

0
58

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर : जैविक आणि सेंद्रिय शेतीसाठी लागणारी औषधे, बियाणे, खतांच्या विक्रीसाठी आवश्यक दुकान परवाना मंजूर करण्यासाठी नऊ हजारांची लाच घेणाऱ्या कृषी अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ही कारवाई झाली. सुनील जगन्नाथ जाधव (वय ५०, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे अटकेतील वर्ग दोनच्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार हे जैविक आणि सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. या शेतीसाठी आवश्यक असलेली बियाणे, खते आणि औषधांची विक्री करण्यासाठी दुकानाचा परवाना मिळावा, अशी मागणी त्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने जिल्हा कृषी कार्यालयाकडे केली होती.

संबंधित अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठविल्याबद्दल वर्ग दोनचे कृषी अधिकारी सुनील जाधव याने तक्रारदारांकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात लाच घेताना जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here