पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोलीत भुयारी मार्ग, अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

0
69

शिरोली : येथील शालेय विद्यार्थ्यांची महामार्ग ओलांडतानाची जीवघेणी कसरत खासदार धैर्यशील माने आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिले.

महामार्गामुळे शिरोली गावचे विभाजन झाले आहे. शिरोली गावच्या पूर्वेला शिवाजीनगर, यादववाडी, मेनन काॅलनी, व्यंकटेशनगर, चौगुले मळा अशी लोकवस्ती आहे. तर पश्चिम बाजूस सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय कार्यालये आहेत. शाळेसाठी सध्या चारपदरी महामार्ग ओलांडून हजारो मुले पूर्वेकडून पश्चिमेकडे येतात.

यासाठी मुलांना मोठी कसरत करावी लागते; पण सहापदरी रस्ता झाला तर मुले रस्ता ओलांडून येऊ शकणार नाहीत. मुलांना दीड किलोमीटरपर्यंत नागाव फाटा किंवा शिरोली फाट्यापर्यंत पायपीट करावी लागेल. म्हणून शिवाजीनगर कमान, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा बाळूमामा मंदिर समोर भुयारी मार्गाची मागणी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी केली.

यावेळी खासदार माने आणि महामार्गाचे प्रकल्प अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भुयारी मार्ग करू, असे आश्वासन दिले. यावेळी महामार्ग अधिकारी वसंत पंदरकर, सी. बी. भरडे, वैभव पाटील, महेश पाटोळे, मिलिंद राव, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच अविनाश कोळी, माजी उपसरपंच सुरेश यादव, युवासेना अध्यक्ष योगेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे, कृष्णात करपे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

लोकमत’ने मांडली होती समस्या

गेल्या १७ वर्षांपासून फक्त शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील हजारो विद्यार्थी जीव धोक्यात घालून पुणे-बंगळुरू महामार्ग ओलांडतात. याबाबत ‘लोकमत’ने ६ ते ८ नोव्हेंबर अशी दोन दिवस मालिका प्रसिद्ध करून आवाज उठवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here