कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशाेकाच्या १०० हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ढासळू लागली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याबाबत महापालिका वृक्षप्राधिकरणने सात दिवसांच्या आत हरकत नोंदविण्याच्या नोटीसा झाडांवर चिकटविल्या आहेत.
याची दखल घेवून पर्यावरणप्रेमी व कुस्तीप्रेमींनी ही झाडे न तोडता त्यांची पुनर्लागवड करावी. अशी मागणी केली आहे.
कुस्ती सम्राट युवराज पाटील व उत्तरेचा प्रसिद्ध मल्ल सतपाल यांच्यात ११ फेब्रुवारी १९८४ ला याच खासबागेत कुस्ती झाली. या दरम्यान महापालिका प्रशासनाने मैदानाचे नुतनीकरण केले. त्यामध्ये तटबंदीलगत सव्वाशेहून अधिक उलटा अशोक जातीची झाडे लावली. त्यातील १०० हून अधिक झाडे आजही दिमाखात उभी आहेत.
मात्र, या झाडांच्या मुळांमुळे तटबंदीला धोका निर्माण झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या खासबाग कुस्ती मैदानाच्या तटंबंदीचे नुतनीकरण करणे गरजेचे बनले आहे. झाडे तोडीसंदर्भात २२ नोव्हेंबर २०२३ ला महापालिका प्रशासक के. मुंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, प्रभारी वृक्षाधिकारी हर्षजित घाटगे,उद्यानाधिकारी समीर व्याघ्रंबरे, पर्यावरण तज्ज्ञ डाॅ. मधुकर बाचूळकर, उदय गायकवाड आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत सात दिवसांच्या आत हरकती नोंदवण्याची सुचना प्रशासकांनी दिल्या. त्यानूसार उद्यान विभागाने येथील प्रत्येक झाडांवर हरकती नोंदविण्यबाबत नोटीसा चिकटविल्या आहेत. त्यामुळे या झाडांची पुनर्लागवड करावी. अशी मागणी कुस्ती प्रेमीं व पर्यावरणप्रेमींतर्फे केली जात आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मैदानातील तटबंदीलगतची अशोकाची झाडे तशीच ठेवून नूतनीकरण करावे किंवा पुनर्लागवडीची हमी घेवून ती तेथून अन्यत्र लावावीत. – अशोक पोवार, कुस्तीप्रेमी
अशोकाच्या झाडांची पुनर्लागवड करावी. पाणी निचरा होण्यासाठी सोय करून भिंतींचे नूतनीकरण करावे. गोल्फ कोर्ससाठी लागणाऱ्या गवताची लागवड रचना आवश्यक आहे. – उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ