इचलकरंजी : फौंड्री व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून १९ लाख ५५ हजार ६२० रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत रंजना बांद्रे (रा. नेर्ली, ता. करवीर) यांनी तक्रार दिली आहे.
अर्चना दिगंबर पाटील (रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर कोल्हापूर), अमोल अरुण काटे (रा. पारिजात सोसायटी, इचलकरंजी) आणि अमर त्रिभुवन मोदी (रा. हडपसर-पुणे. सध्या रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रंजना बांद्रे आणि त्यांचे पती सर्जेराव यांचा फौंड्री व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी एका सहकारी बँकेतून २५ लाख रुपये कर्ज घेतले आहे. ते थकीत गेल्यामुळे दुसरीकडून कर्ज घेऊन ते फेडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते.
या दरम्यान त्यांची संदीप सरनाईक याच्या माध्यमातून अर्चना पाटील व अमोल काटे यांची भेट झाली. त्यांनी रंजना यांना एक कोटी रुपये कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले.
त्या कर्जाच्या मंजुरीसाठी म्हणून वेळोवेळी १९ लाख ५५ हजार ६२० रुपये घेतले. मात्र, कर्ज मंजूर केले नाही. तसेच अमोल मोदी या खासगी सावकाराची भेट घालून देऊन मासिक २० टक्के व्याजाने कर्ज मिळवून देतो, म्हणून १०० रुपयांचा स्टॅम्प आणि दोन कोरे धनादेश घेतले. मोदीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही वरील तिघांनी पुन्हा गुंडांकडून धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.