कोल्हापूर : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम कवडे यांची बिनविरोध निवड झाली.
शुक्रवारी या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी निलकंठ करे होते.
कारखान्यात काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे ए.वाय.पाटील, शेकापचे संपतराव पवार, आणि गोकूळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी २५ पैकी २४ जागा जिंकून सत्तेत आली आहे.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बी.ए.पाटील, प्रा.शिवाजीराव पाटील यांची नावे स्पर्धेत होती. परंतू प्रा.पाटील यांच्या धडाडीचा विचार करून त्यांना संधी देण्यात आली. त्यांच्या नावांची घोषणा आमदार पाटील यांनी केली.
कारखान्यात आता चार गटांची सत्ता आली आहे. कारखाना आर्थिक अडचणीत आहे. शेतकरी संघटना, कामगारांची वारंवार आंदोलने असतात. सर्वांना सोबत घेवून जाणारा आणि खमक्या अध्यक्ष हवा असा विचार करून प्रा. पाटील यांच्याकडे कारखान्याची सुत्रे सोपवण्यात आली आहेत. प्रा.पाटील दोन पिढ्यापासून काँग्रेस आणि आमदार पाटील यांच्याशी एकनिष्ठ आहेत. ते मुळचे देवाळे (ता.करवीर) येथील आहेत.
राष्ट्रवादीला सत्तेत वाटा द्यायचा ठरल्याने कवडे यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला. ते ए.वाय.पाटील यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. करवीर व राधानगरी तालुक्यातील पदे देवून सत्तेचा समतोलही सांभाळण्यात आला आहे.